विशाखासमीर मशानकर

विशाखासमीर मशानकर
"विश्वत" माझे पहिले पुस्तक

Sunday, April 23, 2017

वाचन

वाचन - रोज नविन अध्याय

मी वाचते का ?? हो अर्थात !! मी वाचते ना... पण माझ्या मर्जीने !! मला आवडेल ते.. आवडेल तेव्हा आणि आवडेल तसे !! नियम बांधून ठेवतात... बंधनं आवडत नाही आणि म्हणूनच अगदी वर्तमानपत्रदेखील मी रोजच वाचते असे नाही.
खूप खूप वाचते मी...

तूला वाचनाची आवड आहे ??? प्रश्न रोजचाच पण मला या प्रश्नाचे गूढ़ अजुनही उकललेले नाही. म्हणजे मी अजिब्बात वाचत नाही अशातला भाग नाही. मला आवडतं वाचायला. जे वाचते ते मनापासून.  पण पुस्तके म्हणाल तर फार कमी वाचते मी. एखादे मासिक हाती लागले म्हणून वाचून काढले हां प्रकार कधीच नाही. मनापासून वाचावे वाटले तर अगदी त्या मसिकाचा चोथा करते... जाहिरातीदेखील वाचुन काढ़ते.

मी काय वाचते?? मला आवडतात वाचायला .. माणसं - माझी माणसं, माझ्या आजूबाजूची माणसं, बघितलेली, न बघितलेली स्वप्नातली माणसं देखील...

आरशासमोर उभी राहून वाचते मीच मला. वाचते मझ्यातील बदल.... काळानुरूप बदलत गेलेले.....
आवडतो मला वाचायला माझा भूतकाळही ... कधी जीवघेणा कधी केविलवाणा कधी प्रेमात ओलचिम्ब  करणारा...माझ्याच मुखवट्या मागचा माझाच चेहरा..
वाचते मी नेहमीच माझे हात .... हातावरील तो प्रवास,,,, कोवळेपणा ते निगरगट्ट !! हातावरील रेशांसारखा बदलत गेलेला स्वभाव. हातावरील त्रिशूळ उद्युक्त करायचे पहिले, लढ म्हणायचे... अंध:कारा विरुद्ध, अन्यायाविरुद्ध !! आजकाल लढत असते मीच माझ्याशी.... त्या त्रिशुळाकडे बघत आणि बघता बघता ते त्रिशूल कमलफुल होते... शांत सुन्दर निर्मळ... आणि त्या खाली निर्माण होते जाळे अनाकलनीय....!!
पहिले वाचायची ते जाळे...
 होता त्यावर  माझा भविष्यकाळ...
चंदनाच्या कुपित दडलेला, रेशमाने अलगद विणलेला जरतारी नक्षिचा कोरीव मीनाकारिचा...  सोनेरी स्वप्नांनी सजवलेला !!
आज वाचते तेव्हा ते जाळेही असते क्लिष्ट, गुंतागुंतीचे, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अडकलेले, गुदमरलेले....
मग ती गुदमर झटकुन टाकत शिरते मी दुसर्याच विश्वात !! स्वप्नांच्या राज्यात !! आणि वाचत बसते ती गोड गोड हवी हवीशी वाटणारी स्वप्नं !! आपल्याच धुंद होवून...सिनेमातील पात्रांसारखी...
मी सिनेमादेखील वाचते..... सारी सारी पात्रं. त्यांच्या डायलॉगमागचा त्यांचा चेहरा... कित्ती काय काय लिहिलं असतं ना त्यावर...... ते जे काही बोलतात त्यापेक्षा 100 पट... ते सर्व सर्व वाचायला जाम आवडतं आपल्याला. प्रत्येक गाण्यातले भाव वाचते मी पण गाणे वाचायला शिकले ते माझी मैत्रीण प्रिया प्रभुदेसाईकडून Priya Prabhudesai!! माझ्या वाचनाचा एक नविन अध्याय तेव्हा सुरु झाला....

- विशाखासमीर

No comments:

Post a Comment