विशाखासमीर मशानकर

विशाखासमीर मशानकर
"विश्वत" माझे पहिले पुस्तक

चिलकुर बालाजी - व्हिसा बालाजी

काही काही देवळात किंवा त्या देवळाच्या परिसरात नुसतं गेलं ना कि एक जाणीव होते. त्या देवाचे वास्तव्य तिथे असल्याची. आणि जमिनीवर पाय ठेवताच मनंच काय सारे शरीर हुरळून जातं. त्या जागेवर कधीकाळी असणारा देवाचा वावर आपल्याला आजही जाणवतो आणि मन प्रसन्नतेच्या पलीकडली क्षितीजे गाठतं. असा अनुभव सर्वात पहिले जाणवला तो हिमालयाच्या कुशीत. तिथे सतत शंकराचे अधिष्ठान असल्याची जाणीव होते, नंतर द्वारकेत.... कान्हाच्या बासुरीचे सूर ऐकू येतात ... शिर्डीत सतत साईंचा भास होतो ...सहज जरी रस्त्याने चालत असलो तरी जमिनीवर पाय थांबत नाही. अशीच अजून एक अनुभूती जाणवते ती चिलकूरला.
हैद्राबादला आल्यापासून कितीवेळा चिलकूरला गेलो आठवत नाही. नेहमीच जाणे असते. पण प्रत्येक वेळा श्री बालाजीचे अस्तित्व जे मला तिरुपतीला जाणवले नाही ते इथे जाणवते.
चिलकूर ..... हैद्राबादहून २० किलोमीटरवर असलेले श्री बालाजीचे श्रद्धास्थान.
जाणकार या श्रद्धास्थानाचा इतिहास सांगतात कि येथे एक शेतकरी होता. तो नेहमी श्री बालाजींच्या दर्शनाला तिरुपतीला जात असे. पण तब्येत बिघडल्याने एक वर्ष तो काही तिरुपतीला जावू शकला नाही. त्याला खूप वाईट वाटत होते. एक दिवस श्री बालाजी त्याच्या स्वप्नात आलेत आणि त्यांनी सांगितले कि तू वाईट वाटून घेवू नकोस मी इथेच तुझ्या जवळच्या जंगलात आहे. आणि मग त्याच दिशेने हा भक्त गेला, सांगितलेल्या जागेवर खणू लागला. त्याच्या कुऱ्हाडीला "टन" असा आवाज जाणवला, म्हणून त्याने बघितले तर तिथे श्री बालाजींची मूर्ती होती आणि याच्या कुऱ्हाडीने मार लागल्याने त्यातून रक्तस्त्राव होवू लागला होता. "दुधाचा अभिषेक कर" असा हवेतून आवाज ऐकू आल्याने त्याने तसे केले. रक्तस्त्राव थांबला. श्री बालाजीच्या मूर्तीसोबत अजून दोन मुर्त्या उत्खलनात सापडल्यात. एक देवी श्रीदेवी आणि एक भूदेवी. या तिन्ही मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेच हे श्री चिलकूर बालाजीचे मंदिर.
या मंदिराचे एक वैशिष्ट्य ... इथे मूर्तीकडे डोळे मिटून बघायचे नाही. डोळे उघडे ठेवून देहभान विसरून लीन व्हायचे. भारतातील फक्त दोन मंदिरांपैकी हे एक मंदिर जिथे "First come First Service" इथे कुठल्याही प्रकारची दानपेटी नाही. एकही पुजारी तुमच्याकडून दक्षिणा किंवा दान घेत नाही. फक्त तुम्ही आजारी किंवा म्हातारे असाल तर तुम्हाला तेथील स्वयंसेवक डायरेक्ट मूर्तीजवळ घेवून जातील. आणि स्वयंसेवक कोण तर येथे येणारेच भक्त. ज्याला जसा वेळ असेल तसा तो सेवा देतो ... नि:स्वार्थ भाव आपल्याला इथे बघायला मिळतो.
या श्रीबालाजीचे अजून एक नाव आहे.... "व्हीसा बालाजी" !! या बालाजीला पहिल्या भेटीत ११ प्रदक्षिणा घालायच्या नंतरच्या भेटीत १०८ मग तुम्हाला हवा तो व्हीसा मिळालाच म्हणून समजा... अशी येथील समजूत आहे. त्यामुळे मंदिराच्या विस्तृत परिसरात शेकडो मुलेमुली, आबालवृद्ध तुम्हाला प्रदक्षिणा घालतांना दिसतात. धावपळ करत या प्रदक्षिणा सुरु असतात अगदी पहाटे ३-४ वाजल्यापासून !! तरी मंदिराच्या भिंतीवर मोठ्ठ्या अक्षरात पाटी लिहिली आहे "Don't count on numbers... Concentrate on God"
दर्शन घेवून बाहेर यायचं.... खंडीभर रानमेव्याची दुकानं. मस्त रानमेवा घ्यायचा आणि तो चघळत चघळत तेथून प्रस्थान करायचं..... "गोविंदा गोविंदा... गो....विंदा"


No comments:

Post a Comment