विशाखासमीर मशानकर

विशाखासमीर मशानकर
"विश्वत" माझे पहिले पुस्तक

वेगळा तेलंगणा खरेच कुणाला हवा होता का ??

वेगळा तेलंगणा खरेच कुणाला हवा होता का ??
गेल्या चार दिवसांपासून अगदी वेड लागल्यासारखे आम्ही दोघे फिरतोय. हैद्राबादच्या सर्व मुख्य रस्त्यांवरून... विविध क्षेत्रातील लोकांना भेटतोय... सोशल साईटवरील सर्व पोस्ट, सर्व मेसेजेस न चुकता वाचतोय...  कुठेही आनंद नाही... कसलाही जल्लोष नाही...इथल्या नियतकालिकांचे रकाने भरभरून वाहिले नाही... सर्वत्र शांतता.... निराशा आणि एकच प्रश्न... "एव्हढा मोठा निर्णय घेण्याआधी आम जनतेला विश्वासात घेवून का विचारले गेले नाही कि तुम्हाला वेगळे राष्ट्र हवे आहे का ?" "United we stand Divided we fall"
तेलंगणाचे युद्ध एका विशिष्ट पातळीवर जावून शांत झाले होते. तशी त्या युद्धाची झळ फक्त उस्मानिया युनिवर्सिटीपुरतीच मर्यादित होती. त्या रस्त्यावरून जाणाऱ्या - येणाऱ्याना त्याची किंमतही चुकवावी लागली होती. विद्यापीठाला छावणीचे स्वरूप आले होते. मध्यंतरी "तेलंगणासाठी आत्मदाह" हा प्रकार वाढीस लागला होता. त्यात सो कॉल्ड हुतात्मे म्हणजे गरीब विद्यार्थी टार्गेट करून गर्दीतून खचकन खेचला जायचा आणि त्याच्या अंगावर रॉकेल ओतले जायचे. रात्री एखाद्या मुलाला फासावर लटकवले जायचे तो हुतात्मा.. आज या हुतात्म्यांचे कोठेही कुठेही नाव नाही.  काही दिवसांनी म्हणजे २ -४ वर्षांनी पोलिसांना कळले कि विद्यापीठात "तेलंगणा क्रांती" च्या नावाखाली नक्षलवादी व बाहेरील मुले गोंधळ घालीत आहेत. म्हणजे जे विद्यापीठाचे विद्यार्थीच नाहीत ते राजरोसपणे विद्यापीठात राहून आतंक माजविताहेत. पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करून त्या सर्व बेकायदेशीर लोकांना विद्यापीठातून हाकलून लावले आणि उस्मानिया युनिवर्सिटीतील "तेलंगणा क्रांती"ला पूर्णविराम मिळाला.
आपल्याकडे राजकीय फायद्यासाठी सर्वसामांन्यांच्या भावनांशी चाललेला खेळ काही नविन नाही. तो असाच सुरु राहणार.... दारे खिडक्या बंद करून तुमच्यातील "माणसाला" असेच आव्हान दिले जाईल आणि हा "माणूस" सद्सद्विवेकबुद्धीला तिलांजली देवून पुन्हा नांगी टाकून बसेल. त्याच्यासमोर ५ - १० लोकांना पैसे दिले जातील त्यांच्याकडून ढोलताशे वाजविले जातील. कोणीतरी राणी होईल. कोणीतरी देवी होईल. तिला दुधाने अभिषेक केला जाईल तिच्यापुढ्यात होमहवन केले जाईल आणि समिधा मात्र राहीतील सामान्य माणसाच्या हृदयाच्या .... 

No comments:

Post a Comment